हंसराज,भंडारा बामणी :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बामणी गावात एका संशयास्पद प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील मुख्य रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लिंबू, पूजा साहित्य आणि रांगोळी काढलेली आढळल्याने, हे अघोरी पूजा किंवा भानामतीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बामणी गावातील रस्त्यावर सकाळी ग्रामस्थांना विचित्र पद्धतीने काढलेली रांगोळी, कापलेले लिंबू आणि पूजेचे इतर साहित्य विखुरलेले दिसले. रात्रीच्या अंधारात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या घटनांना ‘भानामती’ किंवा ‘अघोरी पूजा’ मानले जाते, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली असून, अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
ही केवळ कोणाची तरी खोडसाळ वृत्ती आहे की खरोखरच काही अघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात अंधश्रद्धा पसरू नये, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी आणि या कृत्यामागे असलेल्या दोषींचा शोध घ्यावा, अशी मागणी बामणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.








