हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील सिंधी विस्थापितांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी पट्ट्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी , १९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभाग घेऊन प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
भंडारा जिल्ह्यातील सिंधी बांधवांना शासनामार्फत अनेक वर्षांपूर्वी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे या भूखंडांची कायदेशीर मालकी व मालकी पट्टे अद्याप लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
अभय योजनेचा मिळणार लाभ या बैठकीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सिंधी विस्थापितांना ‘अभय योजने’चा लाभ देऊन त्यांच्या मालकी पट्ट्यांची कार्यवाही विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. प्रकरणातील सर्व प्रशासकीय व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून सिंधी बांधवांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांचे ओएसडी (OSD) आणि भाजपा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सिंधी समाजाच्या वतीने पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष संतोष बलवानी, अमरलाल बलवानी, जेसनंद हुंदानी, शंकर बलवानी, बचाराम पंजवानी, गुड्डू खानवाणी, राजकुमार भोजवानी, रुबी चड्डा, शैलेश खरोले व मेश्राम यांच्यासह समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी आणि जागेसाठी प्रतीक्षेत असलेल्या सिंधी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.








