spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार

नागपूर :- मराठी माणूस हा वास्तविक आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद हे अशोक सराफ यांच्या कलाकृतींमध्ये दिसतात. सर्वसामान्यांच्या जीवनातील या भावभावनांना त्यांनी आपल्या अभिनयातून हास्याची आणि आनंदाची किनार दिली.मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करून या सिनेमाला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचे कार्य अभिनेते अशोक सराफ यांनी केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांच्या नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त वसंतराव देशपांडे सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कायर्क्रम आयोजित करण्यात आला. महापौर नीता ठाकरे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार संदीप जोशी, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी- वखरे, नागपूर मनपातील सत्ता पक्षनेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,अशोक सराफ यांच्यासारखे कलाकार लाभणे ही मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कलेचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आजचा नागरी सत्कार हा नागपूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण असल्याचे ते म्हणाले.

अशोक सराफ यांच्या कलाकृतींनी अनेक पिढ्यांना आनंद दिला आहे.अशोक सराफ यांनी आपल्या सर्वांना मराठी सिनेमाची गोडी लावली आहे. रसिकांच्या मनात त्यांनी निर्माण केलेल्या आनंदाचा हा सत्कार असल्याचे ते म्हणाले. आजच्या इतका भव्य सत्कार माझा आजवर झाला नाही, पण प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत, अशी भावना सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

प्रारंभी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी सराफ यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि 5 लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान करून अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे गिरीश गांधी यांनी सन्मान चिन्ह आणि 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच श्री सिद्धी विनायक ट्रस्ट तर्फे १ लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल 80 दिव्यांनी त्यांना यावेळी औक्षण करण्यात आले. महापौर नीता ठाकरे यांचेही यावेळी भाषण झाले.

प्रास्ताविक श्री सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार संदीप जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.