– नवेगाव बांध पर्यटनस्थळाच्या जवळ असलेले कोकणाई माता देवस्थान ट्रेकिंग व पर्यटनाचे आकर्षणाचे केंद्र बनण्याची क्षमता
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी इनसाइडर न्युज टुडे
नवेगावबांध :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा येथील प्रसिद्ध कोकणाई माता देवस्थानाचा शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीमध्ये ‘क’ दर्जा समावेश करून देवस्थानाचा सर्वांगीण विकास करावा, अशी मागणी कवठा ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत माजी सामाजिक न्याय मंत्री तथा विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले.
कोकणाई माता देवस्थान हे केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून नवेगाव बांध या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या अगदी जवळ असलेले निसर्गरम्य पर्यटन केंद्र आहे. देवस्थानाचा परिसर डोंगररांगांनी व्यापलेला असून पावसाळ्यात या परिसरात धुके, हिरवाई आणि निसर्गसौंदर्याची अनोखी अनुभूती मिळते. त्यामुळे पावसाळ्यात कोकणाई देवस्थान परिसराला विशेष आकर्षण प्राप्त होते.
विशेषतः परिसरातील युवा पिढीसाठी हा भाग ट्रेकिंग, निसर्गभ्रमंती आणि पर्यटनाचे आकर्षणाचे केंद्र बनत आहे. डोंगररांगा, धुक्याने वेढलेला परिसर, हिरवाई आणि नवेगाव बांध पर्यटनस्थळाची जवळीक यामुळे कोकणाई देवस्थान परिसराचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास केल्यास या भागात धार्मिक पर्यटनासोबतच साहसी व निसर्ग पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते.
कोकणाई माता देवस्थान हे परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे भेट देतात. मात्र, सध्या आवश्यक पायाभूत सुविधा मर्यादित असल्याने भाविक तसेच पर्यटकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रस्ते, पाणी, स्वच्छता व पर्यटन सुविधांची मागणी
देवस्थान परिसरात सिमेंट-काँक्रीट रस्ता व पायवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज व्यवस्था, पार्किंग, भाविक व पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, भोजनालय तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचे जतन करून त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने शाश्वत विकास करण्याची अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या परिसराचा विकास झाल्यास स्थानिक युवकांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. स्थानिक व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, हॉटेल व खानावळ व्यावसायिक तसेच अन्य सेवा क्षेत्रालाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे कोकणाई देवस्थानाला केवळ तीर्थक्षेत्र म्हणून नव्हे, तर नवेगाव बांध पर्यटन सर्किटशी जोडलेले धार्मिक, निसर्ग व ट्रेकिंग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी पुढे आली आहे.
आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन
कवठा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सरिता लंजे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आमदार राजकुमार बडोले यांची भेट घेऊन निवेदन साद केले. यावेळी पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोळे , माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्यासह कवठा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदन स्वीकारताना आमदार राजकुमार बडोले यांनी ग्रामस्थांच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली असून, कोकणाई माता देवस्थानाला तीर्थक्षेत्राच्या यादीत ‘क’ दर्जा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
कोकणाई माता देवस्थानाचा धार्मिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि नवेगाव बांध पर्यटनस्थळाची जवळीक यांचा एकत्रित विकास झाल्यास अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या पर्यटन नकाशावर या परिसराला महत्त्वाचे स्थान मिळू शकते, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





