नागपूर, ता. ७: राज्यातील बहुजन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य पुरवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेने आणखी एक शौर्यगाथा घडवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) मार्फत 2024 मध्ये घेण्यात आलेल्या जलसंधारण अधिकारी वैज्ञानिक (सिव्हिल इंजिनीअरिंग) गट ‘ब’ पदाच्या परीक्षेत सागर गजानन नाठे या ‘महाज्योती’च्या प्रशिक्षणार्थीने देशात सहावा क्रमांक मिळवून संस्थेचा आणि राज्याचा गौरव वाढविला आहे. सागर नाठे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील जलसंपदा विभागात वैज्ञानिक (सिव्हिल इंजिनीअरिंग) गट ‘ब’ या अधिकाऱ्याच्या पदावर नुकतेच रुजू झाले असून, हा ‘महाज्योती’ साठी आनंदाचा आणि एक ऐतिहासिक क्षण असल्याचा विश्वास ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी व्यक्त केला. ‘महाज्योती’ संस्था राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास (एसबीसी) प्रर्वगातील विद्यार्थ्यांसाठी पूर्व परीक्षा योजना, विद्यावेतन, निवासी प्रशिक्षण केंद्रे, विशेष अभ्यासिका आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या साहाय्याने दर्जेदार अभ्यासासाठी विविध योजना
राबवत आहे.
सागर नाठे याने 2022 मध्ये ‘महाज्योती’च्या पूर्व परीक्षा योजनेत यश मिळवून या योजनांमध्ये सहभाग घेतला. संस्थेने त्याला 11 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण व आर्थिक पाठबळ स्वरूपात विद्यावेतन दिले. या सर्व पाठबळाच्या जोरावर त्याने आपली वाटचाल युपीएससी पर्यंत केली आणि देशात सहावा क्रमांक मिळवून जलसंधारण अधिकारी होण्याचा मान पटकावला. ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सागर नाठेच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले, सागरचे यश हे ‘महाज्योती’च्या सामाजिक बांधिलकीवर आधारित प्रशिक्षण मॉडेलचे यश आहे. संस्थेच्या योजनांमुळे अशा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत असून, शासन सेवेत त्यांच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचा आधार निर्माण होत आहे. वावगे यांनी सागर नाठेचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्याच्या पुढील कारकिदींसाठी शुभेच्छा दिल्या. सागर नाठे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण उमरा येथे झाले, बालपणापासून अभ्यासात चमक दाखवणाऱ्या सागरसमोर उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी होत्या.
‘महाज्योती’चा सागर नाठे UPSC यशाने पोहोचला देशसेवेच्या शिखरावर जलसंधारण अधिकारी पदावर रुजू









