– महापौर श्रावण उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महिलांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या आणि व्यस्त जीवनशैलीतून त्यांना आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, आप्तमैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने वेळ घालवता यावा आणि त्यांच्यातील आत्मविश्वास व सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ‘महापौर श्रावण उत्सव सोहळा’ मनपातर्फे आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नंदनवन येथील त्रिशताब्दी उद्यानात उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवार (ता.२१) रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावणाच्या निमित्ताने आयोजित या आनंदोत्सवात महिलांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महिलांसाठी प्रथमच अशा स्वरूपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निता ठाकरे, हनुमान नगर झोन सभापती ज्योती देवघरे, नेहरू नगर झोन सभापती सीमा ढोमणे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या धुरडे, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती रुपाली ठाकूर, हनुमान नगर झोन सभापती ज्योती देवघरे, नगरसेविका मंगला मस्के, माजी नगरसेविका स्नेहल बिहारे, मनीषा नगरधनकर, रजनी वानखेडे, माजी नगरसेविका विशाखा जोशी, माजी नगरसेविका वंदना भगत, माजी नगरसेविका स्वाती आखतकार, प्रगती पाटील, सविता मते, क्रीडा विभागाच्या उज्ज्वला चरडे, कार्यकारी अभियंता सविता गणोरकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या धुरडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना महापौर यांनी सांगितले की, आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या शहरातील सर्व मैत्रिणींसाठी(महिलांसाठी) महानगरपालिकेच्या सर्व महिला नगरसेविका आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नांतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे नाव लिहितांना जरी महापौर असा उल्लेख असा तरी परिश्रम सर्व महिला नगरसेविकांचे आहे. यावेळी बोलतांना रोजच्या धगधगीतून वेळ काढून आपण सर्व जणी कार्यक्रमाला तयार होऊन नटून-सजून आल्या म्हणून सर्व उपस्थित महिलांचे कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी महापौरांनी गीत गायले. ज्यामुळे कार्यक्रमाला वेगळाच आपलेपणा आणि ऊर्जा प्राप्त झाली.

यावेळी महिलांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद लुटला. यावेळी टास्क, शृंगार, डान्स , गाणे , मजेशीर खेळ घेण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारा सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी सर्व विजेत्या महिलांना “पैठणी साडी व डिनर सेट” देऊन गौरविण्यात आले. संजना नवघरे, प्रीती, संध्या, मंजुषा सदावर्ते या विविध खेळाच्या विजेत्या ठरल्या.








