कामठी तालुका वार्तापत्र
संदीप कांबळे,कामठी :- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बंद पडलेल्या कामठी येथील हुतात्मा स्मारकातील वाचनालयाला अखेर पुनश्च उजाळा मिळाला आहे. वाचनप्रेमी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन कामठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, नगराध्यक्ष अजय अग्रवाल तसेच प्रशासन अधिकारी चोबे यांच्या पुढाकारातून हे वाचनालय पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. वाचनालय पुन्हा सुरू झाल्याने शहरातील वाचनप्रेमी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून नगरपरिषद प्रशासनाचे कौतुक होत आहे.
कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक जीवनावर मोठा परिणाम झाला. अनेक सार्वजनिक उपक्रम आणि संस्था बंद राहिल्याने त्याचा परिणाम वाचनालयांवरही झाला. हुतात्मा स्मारकातील वाचनालय बंद राहिल्याने नियमित वर्तमानपत्रे व पुस्तके वाचणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. शहरातील वाचकांकडून हे वाचनालय पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घेत वाचनालय पुन्हा नागरिकांसाठी खुले केले
वाचनालय सुरू झाल्यानंतर सकाळच्या वेळेत तरुण, मध्यमवयीन तसेच ज्येष्ठ नागरिक हुतात्मा स्मारक परिसरात वर्तमानपत्रे वाचण्यासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध वर्तमानपत्रे वाचून नागरिक देश, राज्य, जिल्हा तसेच कामठी शहरातील स्थानिक घडामोडींचा वेध घेत आहेत.
प्रशासन, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, रोजगार, सामाजिक क्षेत्र, क्रीडा तसेच सार्वजनिक प्रश्नांची माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन उपयुक्त ठरत आहे. विशेषतः शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे वाचनालय दैनंदिन वाचनाची सवय जोपासणारे हक्काचे ठिकाण ठरले आहे.हुतात्मा स्मारकातील वाचनालयात वर्तमानपत्रांसोबत विविध विषयांवरील पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि युवकांसाठी हे केंद्र अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी वर्तमानपत्रांचा मोठा फायदा होणार आहे.
कामठी शहराच्या सामाजिक व ऐतिहासिक जडणघडणीत हुतात्मा स्मारकाला विशेष स्थान आहे. त्याग, संघर्ष आणि देशभक्तीच्या स्मृती जपणाऱ्या या परिसरात वाचनालय पुन्हा सुरू झाल्याने ऐतिहासिक स्मृतींना ज्ञानाच्या प्रवाहाची जोड मिळाली आहे.हुतात्म्यांच्या त्यागातून प्रेरणा घेत नव्या पिढीने शिक्षण, वाचन आणि सामाजिक जाणिवांच्या माध्यमातून सक्षम होणे, हा या उपक्रमाचा व्यापक अर्थ आहे. त्यामुळे हुतात्मा स्मारक परिसर केवळ स्मृतीस्थळ न राहता ज्ञान, चिंतन आणि सामाजिक जागृतीचे केंद्र म्हणूनही विकसित होत आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण आणि ज्ञानाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. ‘वाचाल तर वाचाल’ हा विचार आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही तितकाच महत्त्वाचा आहे. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माहिती क्षणार्धात उपलब्ध होत असली तरी माहितीचे आकलन, विश्लेषण आणि चिकित्सक विचारात रूपांतर करण्यासाठी सखोल वाचन आवश्यक आहे.वाचनालय पुन्हा सुरू झाल्याने कामठीतील वाचनप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. या केंद्राचा अधिकाधिक नागरिकांनी नियमित लाभ घ्यावा, तसेच पालकांनी आपल्या मुलांना व युवकांना मोबाईलच्या वापराबरोबरच पुस्तक वाचनाची सवय लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.. हुतात्मा स्मारकातील पुनश्च सुरू झालेले वाचनालय कामठीच्या वाचनसंस्कृतीला अधिक व्यापक आणि सक्षम दिशा देत, भविष्यात शहरातील ज्ञानाचे प्रभावी व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





