– दोन गटांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर
मुंबई :- ईदच्या मिरवणुकीदरम्यान बुधवारी (26 ऑगस्ट) रात्री परळ परिसरात चांगलाच राडा झाला, रात्रीच्या सुमारास तकिया मशीद परिसरातून दुचाकीस्वार हॉर्न वाजवत होते. त्याला स्थानिकांनी आक्षेप घेतला असता त्यांच्यात आणि दुचाकीस्वारांमध्ये बाचाबाची झाली, अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. काही काळ तणाव निर्माण झाला होता, त्यानंतर पोलिसांनी सौम्य बाळाचा वापर करत जमावाला पांगवलं, सध्या परिसरात शांतता असून खबरदाचीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असताना दोन गटांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून, तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असताना दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दोन गटांमध्ये वाद आणि हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना 26 ऑगस्टच्या रात्री सुमारे 11.45 वाजल्यापासून 27 ऑगस्टच्या रात्री 12.20 वाजेपर्यंत डॉ. बी. ए. रोडवरील सेंट्रल रेल्वेच्या परळ वर्कशॉपसमोर घडली.
लालबाग-परळमध्ये काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, नाकाबंदीच्या वेळी मोठ्या आवाजाचे हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर वापरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत होती. याचदरम्यान सुमारे 50 ते 60 दुचाकीस्वारांनी काही अंतर पुढे जाऊन आपली वाहने थांबवली आणि वाहतुकीला अडथळा निर्माण केला. यावेळी घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मी कॉटेज परिसरात असलेले सुमारे 30 ते 40 तरुणही रस्त्यावर आले. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर वाद वाढला आणि त्यांच्यात झटापट सुरू झाली. दोन्ही बाजूंकडून झेंड्यांच्या काठ्यांचा वापर करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या झटापटीत काही जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन्ही गटांना वेगळे करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेले काही पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल-
सदर प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी रेहान मसूद सय्यद (19), आदिल खान अहमद खान (19) आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस (18) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय जमावातील इतर अज्ञात व्यक्तींविरोधातही कारवाई केली जात आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता मधील कलम 189(1), 189(2), 189(3), 191(1), 191(2), 195(1), 118(1), 121(1) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 137 आणि 133 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत. घटनेनंतर परिसरातील परिस्थिती सध्या शांत असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





