हंसराज,भंडारा :- ‘कनेक्ट विथ कलेक्टर’ या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी भंडारा शहरातील विविध समस्यांकडे जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे लक्ष वेधले होते. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज संताजी वार्ड, राजगुरू वार्ड, शास्त्री चौक,टाकळी परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.
याप्रसंगी भंडारा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुम्मा प्यारेवाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, साक्षी भांडारकर, चैतन्य वाडीभस्मे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी परिसरातील विविध नागरी सुविधांशी संबंधित समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. संबंधित समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
‘कनेक्ट विथ कलेक्टर’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचताच त्याची तातडीने दखल घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत समस्या समजून घेतल्याने प्रशासन नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आणि तत्पर असल्याचे दिसून आले.
नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी संबंधित यंत्रणांना दिला.





