– चिमुकल्या बहिणीने भावाला भरविलेला घास; रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावंडांच्या निरागस नात्याची हृदयस्पर्शी झलक
संदीप कांबळे, कामठी :- रक्षाबंधन म्हणजे केवळ मनगटावर बांधला जाणारा राखीचा धागा नव्हे, तर आयुष्यभर एकमेकांची साथ, काळजी आणि मायेने जपलेले भाऊ-बहीणीचे अतूट नाते होय. या नात्याची खरी श्रीमंती किती साध्या क्षणात सामावलेली असते, याची जाणीव करून देणारे एक हृदयस्पर्शी छायाचित्र सध्या लक्ष वेधून घेत आहे.
छायाचित्रात दोन चिमुकले भावंडे साधेपणाने जेवण करताना दिसत आहेत. समोर ताटात असलेला घास आणि त्या घासापेक्षाही मोठी असलेली बहिणीची माया या क्षणाला भावनिक उंची देत आहे. चिमुकली बहीण आपल्या भावाला स्वतःच्या हाताने घास भरवत आहे, तर भाऊही निरागसपणे तो घास स्वीकारताना दिसत आहे. या एका क्षणात माया, आपुलकी, काळजी आणि भावंडांच्या नात्याची निरपेक्षता सामावलेली आहे.
आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत रक्षाबंधनाचे स्वरूपही बदलत आहे. महागड्या भेटवस्तू, आकर्षक सजावट आणि औपचारिक शुभेच्छांपेक्षा या चिमुकल्या भावंडांचा हा साधा क्षण मात्र नात्यांचा खरा अर्थ सांगून जातो. बहिणीच्या हातून मिळालेला प्रेमाचा एक घास आणि भावाच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान—यापेक्षा मोठी रक्षाबंधनाची भेट दुसरी कोणती असू शकते?
राखीचा धागा काही क्षणांसाठी मनगटावर असतो; मात्र बहिणीच्या मायेचा आणि भावाच्या प्रेमाचा धागा आयुष्यभर मनात गुंफलेला असतो. या चिमुकल्या भावंडांच्या निरागस क्षणाने रक्षाबंधनाच्या सणाला केवळ परंपरेची नव्हे, तर भावनेचीही सुंदर किनार लाभली आहे.
‘नातं मोठं असावं लागत नाही; त्यातली माया मोठी असली की पुरेसे असते,’ हेच सांगणारे हे छायाचित्र रक्षाबंधनाच्या खऱ्या भावनेला शब्दांपेक्षाही प्रभावीपणे अधोरेखित करत आहे.





