spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष नीरज कळंबे यांना अटक

मोवाड :- मोवाड नगरपरिषद कार्यालयातील महत्त्वाची फाईल परवानगीशिवाय घेऊन गेल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष नीरज कळंबे यांच्याविरुद्ध नरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे .

नगरपरिषद कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली . मुख्याधिकारी अमोल परिहार कार्यालयात उपस्थित नसताना त्यांच्या कक्षात जाऊन टेबलवरील फाईल घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. कार्यालयीन कामासाठी नागपूरला जाण्यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित फाईलची पाहणी केली असता ती आढळून आली नाही. त्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून फाईलचा शोध घेण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर फाईल कक्षातून नेण्यात आल्याचे निदर्शनास आले.

यानंतर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी नीरज कळंबे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू होता . आज नीरज कळंबे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांव पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास ठाणेदार मंगला मोकाशे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण करीत आहे .

राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण

या प्रकरणामुळे मोवाड शहरातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, काही राजकीय कार्यकर्त्यांनी या घटनेचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वीच्या एका वादग्रस्त प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सद्य फाईल गायब प्रकरणातील आरोप व त्यामागील वस्तुस्थितीचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.