– ऑनलाइन मतदानातून विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाही प्रक्रिया; आरुषी मेहेर मुख्यमंत्री तर लक्ष्मी आष्टनकर उपमुख्यमंत्री
खापा, वार्ताहर :- मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने पीएमश्री नगरपरिषद राजेंद्र हायस्कूल, खापा येथे बालपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, नेतृत्वगुणांना वाव मिळावा, तसेच निर्णयक्षमता व जबाबदारीची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळेत दोन दिवसांपासून प्रचाराची लगबग सुरू होती. विविध उमेदवारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपापल्या भूमिका मांडल्या. त्यामुळे शाळेच्या परिसरात निवडणुकीचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
बालपंचायतीसाठी इलेक्शन ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन मतदान घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला. मतदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, मतदाराची जबाबदारी आणि निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
“३५ उमेदवार निवडणूक रिंगणात”
बालपंचायत निवडणुकीसाठी एकूण ३५ विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढविली. यामध्ये आरुषी मेहेर, पूर्वी अरविंद गढे, कल्याणी ठमके, दिशा लहुजी पारडकर, श्रेया शेंद्रे, सोनाली काकडे, गार्गी मोहटे, आर्वी विनोद मारोतकर, पियुष रवींद्र निनावे, टीना प्रकाश वराडे, प्राप्ती रुकमाकांत शिवले, निधी मुकेश बावनकुळे, शिवन्या नितेश गोंडाने, प्रणवी रुपेश श्रोते, पूर्वेश प्रशांत चिंचखेडे, तारुण्य यशवंत ढगे, कान्हा राजेंद्र तायवाडे, हनिष अमित कोसे, हिमांशू वेळेकर, रोनक सुनील जांगडे, लक्ष्मी आष्टनकर, परेश अक्षय राऊत, तृप्ती पुरुषोत्तम रागासे, सेजल चुडामन धार्मिक, कनिष्का राजेश पडोळे, आराध्य गिरेपुंजे, नैतिक आनंद बोरकर, साकिब अफसर छवारे, ओम बाजनघाटे, हर्ष पोईनकर, अश्मिरा शेख, चैताली प्रमोद तांदुळकर, चैतन्य गणेश ढगे, निधी चरडे आणि साहिल देवेंद्र ठमके यांचा समावेश होता.
“आरुषी मेहेर मुख्यमंत्री; लक्ष्मी आष्टनकर उपमुख्यमंत्री”
मतदानानंतर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात आला. बालपंचायत निवडणुकीतून एकूण १५ सदस्यांचे मंत्रिमंडळ निवडण्यात आले. यामध्ये आरुषी मेहेर यांची मुख्यमंत्री, तर लक्ष्मी आष्टनकर यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली. निवडून आलेल्या मंत्रिमंडळात हर्ष पोईनकर, साकिब अफसर छवारे, नवनाथ जांगडे, श्रेयस शेंद्रे, आराध्य गिरीपुंजे, आर्वी मारोतकर, सोनाली काकडे, प्रणवी श्रोते, कान्हा तायवाडे, तृप्ती रागासे, सेजल धार्मिक, तारुण्य ढगे आणि शिवन्या गोंडाने यांची सदस्य म्हणून निवड झाली.
विजयी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
बालपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व, निर्णयक्षमता, संघभावना, जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. शालेय जीवनातच लोकशाही मूल्यांची रुजवणूक करून भविष्यातील जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
नगराध्यक्ष पियुष बुरडे, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, शाळेचे मुख्याध्यापक सुनील नेहारे, पर्यवेक्षक शामराव खडसे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन समिती, पालक समिती, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी निवडून आलेल्या सर्व बालपंचायतच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या.








