– शकूर नागानींसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कामठी :- ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वाचा उत्साह कामठी शहरात पाहायला मिळाला. मोहम्मद अली मंच येथून निघालेल्या जुलूसाचे काँग्रेसच्या वतीने जुन्या पोलीस ठाण्याजवळ भव्य स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिली मुबारकबाद दिली.
या स्वागत सोहळ्याला नगर परिषद माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव शकूर नागानी आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अवंतिका लेकुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जुलूसातील मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शकूर नागानी यांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पर्वाचे सामाजिक महत्त्व उल्लेखित केले.याप्रसंगी ते म्हणाले, “हा पर्व केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. कामठीची गंगा-जमुनी तहजीब आणि सर्व समाजांतील परस्पर ऐक्य हीच शहराची खरी ओळख व ताकद आहे. ही एकतेची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे.”
जुन्या पोलीस ठाण्याजवळ उभारण्यात आलेल्या स्वागत मंचावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुलूसाचे आत्मीयतेने स्वागत केले. गुलाबपुष्प देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे परिसरात एकता, भाईचारा आणि सामाजिक सद्भावनेचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी आसिफ सरमतिया (नगरसेवक), आरिफ सरमतिया, फैसल नागानी, अभय गेडाम, राजकुमार गेडाम, शीर्ष सांगेवार, इस्मत नागानी, मोहम्मद परवेज, मनोज यादव, तुषार दवानी, मनीष गजभिए, संदीप जैन, फारूक कुरैशी, सुनील वाघमारे, नूरी नागानी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.





