– म्युल खात्यांद्वारे कोट्यवधींच्या व्यवहाराचा आरोप; उर्वरित रकमेसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा
पांढरकवडा :- गरिबांच्या नावावर बँक खाती उघडून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याच्या कथित प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात तक्रारदाराकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच उर्वरित रकमेसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी यवतमाळ नगरपरिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक जावेद परवेज अंसारी (४५, रा. तारपुरा, यवतमाळ) यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकवडा परिसरातील गरीब व्यक्तींच्या नावावर म्युल बँक खाती उघडून त्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचा प्रकार यापूर्वी समोर आला होता. या प्रकरणात पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष तथा यवतमाळ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक संतोष बोरेले यांनी यवतमाळचे आमदार अनिल मांगुळकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता.
या प्रकरणातील तक्रारीनुसार, ९ जुलै रोजी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान उमरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली जावेद अंसारी यांनी प्रकरण मिटविण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी १० लाख रुपये त्याच दिवशी देण्यात आले; मात्र उर्वरित १० लाख रुपये प्रकरण मिटवल्यानंतर देण्याचे ठरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रकरण मिटविण्यासाठी संतोष बोरेले यांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र बोरेले यांनी कोणत्याही प्रकारचे सेटलमेंट केले नसल्याचे सांगून तक्रार मागे घेतली नसल्याचे वृत्त आहे. त्यानंतर उर्वरित १० लाख रुपयांसाठी धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.
या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी जावेद अंसारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत आरोपीची अटक झालेली नव्हती.





