– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
नाशिकमध्ये कुंभमेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौरा आणि मेळावाही उत्तम झाला. हिंदूंचा उत्सव आम्ही मोठ्या थाटात साजरा करणार आहोत. मात्र जनाब संजय राऊत, तुमच्या पक्षातील 99 टक्के लोक शिवसेना, भाजपात गेलेत त्याचे आत्मचिंतन करा. धूळधाण उडालेल्या आणि वाताहात झालेल्या आपल्या पक्षातल्या उरलेल्या खुर्च्या सांभाळा. अन्यथा त्याही शिल्लक राहणार नाहीत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
साधुसंत आणि नाशिककरांनी कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावत भव्य स्वागत केल्याचे सांगून बन म्हणाले, संजय राऊत, तुम्हाला साधुसंतांची अॅलर्जी आहे. पालघरमध्ये साधूंचे मॉब लिंचिंग झाले होते तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे तुम्हाला साधुसंतांवर बोलण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतलेय आणि तिथे विकासकामे जोरात सुरू आहेत. ही विकासकामे पूर्ण होतील, तेव्हा नाशिककर त्यांचे भव्य स्वागत करतील. नाशिकचे खड्डे, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. स्वतः गिरीश महाजन, दादा भुसे हे समन्वयाने उत्तम काम करत आहेत.
बन पुढे म्हणाले, टेंडरबाजी, कमिशनबाजी ही उबाठा गटाची आणि संजय राऊत यांची परंपरा आहे. संजय राऊत, तुम्हाला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शंभर दिवस आर्थर रोडच्या तुरुंगात राहावे लागले. पत्राचाळीत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून मराठी माणसाला बेघर करणारे तुम्ही. कोविडच्या काळात जम्बो कोविड सेंटरच्या कंत्राटात कमिशन खाणारे तुम्ही. रोज शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देऊन महाराष्ट्राला लुटणारे तुम्ही. तुम्ही भ्रष्टाचाराच्या गप्पा माराव्यात?
संजय राऊत, तुमच्या पक्षाचे माकड झालेय. माकडाच्या हाती मशाल, अशी अवस्था विधानसभेला आपण पाहिली. ती मशाल विझवण्याचे काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलेय. कुठे महात्मा गांधींची माकडे शोधत बसताय? मशाल घेऊन उबाठा गट जाळण्याचे काम तुम्ही करताहात. या माकडापासून सावध होण्याची गरज उद्धव आणि आदित्य ठाकरेंना आहे, असे बन यांनी सुनावले.
हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालायचा, कुंभमेळा, राम मंदिराला बदनाम करायचे आणि औरंगजेबाचा, बाबराचा उदो उदो करायचा, ही परंपरा दुर्दैवाने उबाठा गटाने सुरू केली आहे. कुंभमेळ्याच्या जागी इज्तेमा असता तर संजय राऊतांनी जोरजोरात छाती पिटून त्याचे स्वागत केले असते. कुंभमेळ्याच्या जागी हज यात्रेचे नियोजन केले असते, नमाज स्पर्धा ठेवली असती तर संजय राऊतांनी मोठमोठे बॅनर लावून स्वागत केले असते. हिंदू एकत्र आला की आपली पळता भुई थोडी होईल. हिंदू जागा झाला की आपला औरंगजेब फॅन क्लब गुंडाळून ठेवावा लागेल म्हणून तुम्ही कुंभमेळ्याला विरोध करतायेत. ‘मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे’ म्हणून राम मंदिराच्या आंदोलनाची खिल्ली उडवणारे उद्धवजी ठाकरे होते. आज राम मंदिर थाटात उभे आहे. तुम्ही कुंभमेळ्याला विरोध करताय, पण कुंभमेळाही मोठ्या थाटात होईल, असे बन यांनी ठणकावून सांगितले.





