spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करा

– गणेशोत्सव मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत मान्यवरांचे आवाहन

नागपूर :- नागपूर महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त समन्वय बैठक रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी (ता.२९) पार पडली. बैठकीत सर्व गणेशोत्सव मंडळानी आपल्या मंडळात समाजोपयोगी उपक्रम राबवीत पर्यावरणपूरक असा गणेसोत्सव साजरा करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. यावेळी बैठकीला महापौर निता ठाकरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, पोलीस सह पोलीस आयुक्त  नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अपर पोलीस आयुक्त  विनीता साहू, वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी, एन.राश्मिता राव, रमेश धुमाळ, पोलिस उपायुक्त संदीप पाखले, पोलिस उपायुक्त राहुल माखनीकर, दीपक अग्रवाल, आदित्य मिरखेलकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त राजेश भगत, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : महापौर

उपस्थितांना मार्गदर्शन करीत महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, श्रीगणरायाच्या आगमनाने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना अडचण होणार नाही याची दक्षता घेत मंडळांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन केले.

युवकांना सकारात्मक दिशा देणारा गणेशोत्सव : पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गणेशोत्सव हा सामाजिक ऐक्य आणि नवीन नेतृत्व घडविणारा उत्सव असल्याचे सांगत प्रत्येक मंडळाने स्वयंसेवकांची सक्षम व्यवस्था ठेवावी, महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे, रचनात्मक आणि समाजाला अभिप्रेत असणारा गणेशोत्सव साजरा करावा, तसेच मंडळानी सर्वांसाठी व्यसनमुक्ती, रक्तदान व समाजप्रबोधनाचे उपक्रम मंडळात गणेशोत्सवादरम्यान राबवावे, जेणेकरून यंदाचा गणेशोत्सव हा युवकांना सकारात्मक दिशा देणारा गणेशोत्सव ठरेल असे आवाहन केले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करा : आयुक्त डॉ. विपीन

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाद्वारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली, तसेच गणेशोत्सवादरम्यान नागरिकांनी मनपाच्या आपली बस, मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्याचे आवाहन केले. याशिवाय त्यांनी मंडळांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर करण्याचे ही आवाहन केले.

बैठकीत मंडळांद्वारे प्राप्त सूचनांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी यांना दिले. गणेशोत्सवादरम्यान मनपाद्वारे स्वच्छतेची उत्तम काळजी घेण्यात येईल असे आश्वासित करीत त्यांनी मंडळानी देखील त्यांच्या कचरा व निर्माल्य एकाच ठिकाणी जमा करावे, मनपाद्वारे दिवसातून दोन वेळा कचरा संकलन करण्यात येईल. निर्माल्य संकलनासाठी विशेष वाहने उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यापासून खत आणि उदबत्ती निर्मितीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.

सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी प्रत्येक मंडळाने स्वयंसेवकांची यादी तयार ठेवावी, आगमन व विसर्जन मिरवणुकांचे नियोजन करावे, सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

बैठकीत विविध गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक व्यवस्थापन, विसर्जन मार्गांवरील गर्दी, मार्गावरील तारा, पार्किंग, डास नियंत्रण, निर्माल्य संकलन, सीसीटीव्ही व्यवस्था, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, ध्वनी व्यवस्थापन आणि परवानगी प्रक्रियेबाबत विविध सूचना मांडल्या. यासर्व सूचना नोंदवून संबंधित विभागांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, अनीत कोल्हे यांनी तर आभार संदीप पाखले यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी ५,००१ शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने शाडू मातीची पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती घडविण्याची संधी मिळणार आहे. ही कार्यशाळा दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कविवर्य सुरेश भट्ट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. नागपूर शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णतः नि:शुल्क असून, सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करा. नोंदणीसाठी https://nagpur-green-kids.emergent.host या लिंकवर क्लिक करा. आणि मंडळातील एका प्रतिनिधीने यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.