spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर मनपा निवडणूक जवळ; प्रभागरचनेचा मसुदा जाहीर, वाढलेली मतदारसंख्या ठरणार निर्णायक

 

नागपूर महापालिका निवडणूक: प्रभाग रचना जाहीर, वाढीव मतदारांमुळे भाजपचा आत्मविश्वास?; विरोधकांमध्ये एकीचा अभाव

नागपूर ८ :  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर होणाऱ्या नागपूर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग पुनर्रचनेचा मसुदा अखेर राज्याच्या नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच एकूण 38 प्रभाग ठेवण्यात आले असून, प्रत्येक प्रभागात सुमारे 60 ते 65 हजार मतदारांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नव्या मतदारसंख्येच्या आधारे विकासाच्या मुद्द्यावर भाजपला बहुमत मिळवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सध्या शहरात इच्छुक उमेदवारांच्या होर्डिंग्जची रेलचेल पाहायला मिळत आहे. एकूण नोंदणीकृत मतदार 24 लाख 84 हजार 250 इतके झाले असून, ही संख्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. नव्या प्रभागरचनेनुसार 37 प्रभागांमध्ये प्रत्येकी चार नगरसेवक आणि 38व्या प्रभागात तीन नगरसेवक अशी एकूण 151 नगरसेवकांची संख्या कायम राहणार आहे, जी 2017 मध्येही होती.

या मसुद्यानुसार निवडणुकीची तयारी नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. 11 ऑगस्टपर्यंत हा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान मसुदा सार्वजनिक केला जाईल आणि 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात आक्षेप व हरकतींसाठी सुनावणी होईल. अंतिम मसुदा 15 सप्टेंबरपर्यंत नगर विकास विभागाकडे सादर केला जाईल.

गेल्या निवडणुकीत भाजपने 108 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. काँग्रेसला 29, बसपाला 10, शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली होती. यंदा प्रभागांच्या सीमारेषांमध्ये काही बदल झाल्याने राजकीय चित्रातही काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विरोधकांमध्ये अद्यापही एकीचा अभाव असल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास अधिक ठळकपणे जाणवतो.

Popular Articles