spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूबद्दल राहुल गांधी काँग्रेस नेत्यांची हकालपट्टी करणार का

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल

मुंबई :- नाशिक दौऱ्यावर असलेले राहुल गांधी गडचिरोली येथे आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूबद्दल संस्थाचालक काँग्रेस नेत्यांची हकालपट्टी करणार का, हर्षवर्धन सपकाळ यांना जाब विचारणार का, असे घणाघाती सवाल करत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राहुल गांधी यांना विद्यार्थी आणि तरुणाईशी काही देणेघेणे नसून त्यांचा ‘छात्रों की गूंज’ म्हणजे ‘पैसोंकी गूंज’ आणि ‘झूट की गुंज’ असल्याची टीका बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आदिवासी विद्यार्थ्यांची चिंता असती तर राहुल गांधींनी आश्रमशाळेचे काँग्रेस नेते मारोतराव कोवासे आणि गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी केली असती. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि राजकीय पोळी भाजायची याच तुमच्या धोरणामुळे जनतेने तुम्हाला नाकारले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी आंदोलन केल्याने कदाचित आपली दोन-चार मते वाढतील, असा तुमचा प्रयत्न आहे. पण तुमचा नाटकीपणा महाराष्ट्रासह देशाला माहित आहे, असे बन यांनी सुनावले.

संजय राऊत, तुम्ही आणि तुमचे मालक दरोडेखोर आहात. 2019 ला महायुतीत निवडणूक लढून मतांवर दरोडा टाकत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून राहुल गांधींना नेता म्हणून स्वीकारायचे याला दरोडा म्हणतात. अमितभाई शाह यांच्यामुळे तुमची पळता भुई थोडी झाली. अमितभाई या देशाचे लोहपुरुष आणि कणखर गृहमंत्री आहेत. त्यांच्या नादी लागलात ना तर तुमचा उरलासुरला कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणाचाही नाद करा, पण भाजपाचा नाद करू नका. एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा की अमितभाई शाह यांचा दणका कसा असतो ते. त्यांनी देवाभाऊंनाही आव्हान दिले होते, ‘एक तर तू राहशील किंवा मी राहीन.’ काय झाली उद्धवजी ठाकरे तुमची अवस्था विधानसभेनंतर? महापालिकांमध्ये तर भोपळाही फोडता आला नाही, अशा शब्दात बन यांनी निर्भत्सना केली.

या देशाचे पंतप्रधान म्हणून लागलेला नरेंद्र मोदीचा फोटो काढणाऱ्यांना अद्दल घडवली जाईल, असे सांगून बन म्हणाले, आता मातोश्रीत अभिजीत दीपके आणि औरंगजेबाचे शेजारीशेजारी फोटो लागले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करून, त्यांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही औरंगजेबाचा फोटो मातोश्रीवर लावता, पण तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो चालत नाही. मोदींचा फोटो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. तुमच्यासारखे औरंगजेबाचे फोटो घेऊन मत मागणारे आम्ही नाही. आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला अभिमान आहे का औरंगजेबाबद्दल आणि राहुल गांधींबद्दल, याचा जाब संजय राऊत यांनी द्यावा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.