– मनपाच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद
– “गणपती बाप्पा मोरया”च्या जय घोषाने दुमदुमले परिसर
नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने मनपासह इतर शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला अन् सुप्त कलागुणांना वाव देत शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक असे गणपती बाप्पा साकारले, पहिल्यांदाच जवळपास ५ हजार विद्यार्थांनी आपल्या चिमुकल्या हातांनी श्री गणरायांची मूर्ती घडविली. महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मनपाद्वारे गुरूवारी (ता.०३) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यासोबतच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनेच साजरा करणार असल्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली.
कार्यशाळेला स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लड्ढा, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनिषा अतकरे, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, स्वच्छ भारत मिशन नागपूरच्या ब्रँड अँबेसिडर व तेजस्विनी महिला मंचच्या प्रमुख किरण मुंदडा यांनी उपस्थित राहून विद्यार्थांच्या उत्साह वाढविला. विशेष म्हणजे, महापौर निता ठाकरे यांनी श्री गणेशमूर्तीला घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तर मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी विद्यार्थ्यासह सेल्फी घेत त्यांच्या आनंद द्विगुणित केला. “गणपती बाप्पा मोरया”च्या जय घोषात कार्यशाळेला प्रारंभ झाला.

कार्यशाळेत मनपाच्या ५६ शाळेतील विद्यार्थ्यांनी तर शहरातील विविध २० शाळेतील विद्यार्थ्यांनी अशा एकूण ७६ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे, यामाध्यमातून विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. महापौरांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उत्साहपूर्ण सहभागासाठी त्यांचे कौतुक केले. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यास मदत मिळावी याकरीत अशा कार्यशाळांचे आयोजन महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर आयुक्त डॉ. विपीन यांनी महाराष्ट्रभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, महानगरपालिकेने यावेळी इको-फ्रेंडली मूर्तीना बनवण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या पोर्टलच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग नोंदविल्याचे ही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी तर आभार मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले यांनी व्यक्त केले.
विविध मूर्तींनी वेधले लक्ष
कार्यशाळेत प्रशिक्षक नाना मिसळ, गौरव सावरकर, निशांत कवडते, पास्थणकर यांच्यासह शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना मूर्ती साकारण्यास मदत केली. कार्यशाळेत प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले, त्याचे अनुकरण करत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार आकर्षक अशा मृर्ती तयार केल्या. याकरिता विद्यार्थांना शाडूची माती व कलाकृतीचे साहित्य प्रदान करण्यात आले.
श्रीगणेशाच्या विविध मूर्तीचे विद्यार्थ्यांनी बनविल्या ज्यात ज्योतिबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कल्पकतेने बनवलेल्या नागपूरच्या प्रसिद्ध श्री टेकडी गणपतीची प्रतिकृती लक्ष्यवेधी ठरली, मूषकस्वार श्रीगणेश, दैत्य मर्दन करतांना अशी मूर्ती काही विद्यार्थ्यांनी साकारली, तसेच मयूरावर स्वार श्री गणेश, सिंहासनावर विराजित अशा अनेक मूर्तींनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात श्रीगणेश मूर्ती बनविल्या, अनेक विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मूर्तींना घरी नेले असून, उर्वरित मूर्तींना मनपाद्वारे अधिकाऱ्यांना स्थापन करण्यासाठी दिले जाणार असून, इच्छुक नागरिकांनाही स्थापन करण्याकरिता देण्यात येणार असल्याचेही उपायुक्त यांनी सांगितले.





