spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पोलिस प्रशासनाला रेनकोटचे वाटप

– मुसळधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक उपक्रम

नागपूर :- मान्सूनच्या काळात प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. बँकेच्या विपणन आणि विकास निधीअंतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. नागपूर येथील पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक भागवत माळगे तसेच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रेनकोट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुसळधार पावसातही कायदा- सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस कर्मचारी रस्त्यावर कर्तव्य बजावत असतात. अशा परिस्थितीत त्यांना रेनकोट उपलब्ध करून देणे, तसेच विपणन व विकास निधीचा उपयोग करून समाजाचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक प्रतिमा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक भागवत माळगे म्हणाले, महाराष्ट्र पोलिस दल हे २४ तास जनतेच्या सेवेत तत्पर असते. पावसातही निष्ठेने कर्तव्य बजावणाऱ्या या रक्षकांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. त्यांना मदत करताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेला सार्थ अभिमान वाटतो. या उपक्रमाबद्दल उपस्थित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मनापासून आभार मानले. पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी, स्थानिक शाखा व्यवस्थापक तसेच पोलिस दलातील अधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.