– मनपाची मोठी कारवाई
नागपूर :- थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची धडक मोहिम सुरू करण्यात आली आहे. शहरातील दहाही झोनमधील थकीत मालमत्ता कराच्या वसुलीच्या मोहिमेला सुरूवात झाली असून, गुरुवारी (ता.३) रोजी नेहरूनगर झोनद्वारे मे. विठोबा लॉन यांच्याकडून ५ लाख ४८ हजार ४८० रुपयांची वसुली करण्यात आली, तसेच माजी पोलीस कर्मचारीकडून ६ लाख ५५ हजार ९९३ रुपयांची वसुली करण्यात आली. अशी एकूण १२ लाख ४ हजार ४७३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ही मोहीम येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
महापौर निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम करीत आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर तथा कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कावरे यांनीही नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे.
मालमत्ता कर वसूली अभियानांतर्गत नेहरूनगर झोन परिसरातील मे. विठोबा लॉन या व्यावसायिक आस्थापनेकडे १ एप्रिल २०२२ – ३१ मार्च २०२६ या कालावधीत ५ लाख ४८ हजार ४८० रुपयांची थबकबाकी प्रलंबित होती. मालमत्ता कराच्या विरोधात न्यायालयात दाद मागितल्याचे सांगत वारंवार महानगरपालिकेची दिशाभूल करत होते. महापालिकेद्वारे आस्थापनेविरोधात चल-अचल मालमत्ता जप्ती वारंट बजावून प्रत्यक्ष कारवाई सुरु होताच आस्थापनेद्वारे थकीत कराची संपूर्ण रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच माजी पोलीस कर्मचारी महादेवराव डाखोरे यांच्याकडे थकीत असलेल्या कराची भरपाई न झाल्याने त्यांच्या मालमत्तेतील नळ जोडणी खंडित करणे व कार्यालयातील साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली असता जागेवरच ६ लाख ५५ हजार ९९३ रुपयांच्या थकीत कराची भरपाई करण्यात आली.





