नागपूर ८ : भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व २०२५ अंतर्गत नागपूर जिल्हा ग्रामीण (काटोल) या नव्याने गठित जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, युवकांच्या प्रतिनिधित्वासाठी पियुष बुरडे यांची भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (काटोल) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
काटोल, सावनेर आणि हिंगणा या विधानसभांना समाविष्ट करत भाजपाने संघटनात्मक दृष्टिकोनातून जिल्ह्याचे पुनर्रचना केली आहे. या नव्या जंबो कार्यकारिणीत सर्व समाजघटक, वयोगट आणि क्षेत्रांचा समतोल राखण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर झाली. यामध्ये पियुष बुरडे यांच्या अध्यक्षतेखाली अनिकेत अंतुरकर, इशांत राऊत आणि मंदार वानखेडे यांची महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडीसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक आमदार व नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. पक्षाने युवकांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत बुरडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर पियुष बुरडे यांनी सांगितले की, “भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना पक्षाशी जोडून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी कार्य करणार आहे. पक्षवाढ आणि सामाजिक सहभाग यावर लक्ष केंद्रित केले जाईल.”
या निवडीमुळे काटोल जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून पक्षवाढीला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.








