संदीप कांबळे, कामठी :- ‘शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर’ अशी ओळख असली, तरी कामठीतील काही शाळांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या ज्ञानमंदिरांच्या पायाभूत सुविधांची दुरावस्था आणि प्रशासनासमोरील आव्हाने पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत १९ ते २५ ऑगस्टदरम्यान शहरातील काही खासगी व नगर परिषद शाळांची असे एकूण 10 शाळांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षा, वर्गखोल्या, शिक्षकसंख्या तसेच शाळांच्या इमारतींच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक त्रुटी निदर्शनास आल्याचा दावा अभियानाच्या अहवालातून करण्यात आला आहे.
पाहणी करण्यात आलेल्या शाळांपैकी प्रामुख्याने कामठी नगर परिषद च्या वतिने सुरू असलेल्या नगर परिषद शाळेपैकी नगर परिषद डॉ. बी. आर. आंबेडकर उर्दू शाळा (आंबेडकरनगर, छावणी), नगर परिषद स्व. दयालसिंग यादव मराठी शाळा (सिंधी मोहल्ला) आणि नगर परिषद तिलकधारी हिंदी माध्यमिक शाळा (लाला ओली) या तीन शाळांमधील परिस्थिती विशेष गंभीर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तीन शाळांमध्ये गंभीर परिस्थिती
डॉ. बी. आर. आंबेडकर उर्दू शाळेच्या परिसरात दारूच्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. शाळेच्या मागील बाजूस कुत्र्यांचे पालन होत असल्याचेही पाहणीत दिसून आल्याचे अहवालात नमूद आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिसरात अशा प्रकारच्या बाबी आढळणे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे अभियानाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
स्व. दयालसिंग यादव मराठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि संरक्षक भिंतीलगत उघडी व अस्वच्छ नाली असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी स्थानिकांकडून नियमितपणे कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.नगर परिषद
तिलकधारी हिंदी माध्यमिक शाळेतील काही वर्गखोल्यांच्या भिंतींना मोठे तडे गेल्याचे तसेच फरशीची स्थिती खराब असल्याचे पाहणीत आढळल्याचा दावा आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वच्छतागृहांपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत प्रश्नच प्रश्न
पाहणी केलेल्या १० शाळांपैकी काही शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने नियमित स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. काही ठिकाणी तुटलेली अथवा अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वॉटर कूलर परिसरातील अस्वच्छता आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत काही शाळांमध्ये वर्गखोल्या तसेच शिक्षकांची संख्या अपुरी असल्याचेही पाहणीत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचा परिणाम अध्यापनाच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
काही शाळांमध्ये मजबूत कंपाउंड वॉल आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा नसल्याचेही अहवालातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
शाळांच्या स्वयंपाकघरांमध्ये योग्य वायुवीजन, पक्के छत तसेच धूर आणि कीटकांपासून संरक्षणाची व्यवस्था करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेसह पौष्टिकतेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘फक्त अहवाल नको; प्रत्यक्ष कारवाई हवी’
शाळांमधील समस्यांवर केवळ कागदोपत्री अहवाल तयार करून थांबण्याऐवजी नगर परिषद प्रशासनाने प्रत्येक शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.
धोकादायक अवस्थेतील इमारती व वर्गखोल्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तांत्रिक तपासणी, खराब स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती, नियमित स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यक शिक्षकांची नियुक्ती तसेच कंपाउंड वॉल आणि सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सवाल
शाळेच्या भिंतींना तडे असतील, परिसर अस्वच्छ असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असेल आणि सुरक्षेच्या सुविधा तोकड्या असतील, तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचे सुरक्षित वातावरण कसे मिळणार, हा मूलभूत प्रश्न या पाहणी अहवालामुळे उपस्थित झाला आहे.
‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत पाहणी करणाऱ्या पथकात सुगत रामटेके, भारत बनाईत, मो. तनवीर अथान, चेतन फुलमाडी, रोहन पौणिकर, गणेश आगरे, प्रियाशु बोदीले, रजनी रहांगडाले आणि वैदेवी पिलारे यांचा समावेश होता.
नगराध्यक्ष अजय अग्रवाल– तीन शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर; लवकरच कार्यादेश–
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या पथकाने नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांची भेट घेऊन पाहणी अहवाल सादर केला. यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले की, अभियानाच्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या तीन नगर परिषद शाळांची नगर परिषद प्रशासनाकडून यापूर्वीच पाहणी करण्यात आली असून, दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर झाला आहे. संबंधित कामांचे कार्यादेश काढून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.
गेल्या काही वर्षांपासून काही नगर परिषद शाळांची दुरवस्था कायम होती. तत्कालीन प्रशासनाकडून त्याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. मात्र, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार कामठीतील शिक्षण व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षांनी सांगितले की, पदभार स्वीकारल्यानंतर नगर परिषद शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासोबतच शैक्षणिक वातावरण सुधारण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग वाढविण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या गणवेश भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. लवकरच विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
अशा प्रकारे, अभियानाने शाळांमधील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या असल्या, तरी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने स्कुल ठीक करो अभियान पथकाचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी आभार मानले.व शाळांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून सदैव मार्गदर्शन करण्याचे मनोगत व्यक्त केले.





