हंसराज,भंडारा कारधा :- कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून २ लाख १२ हजार रुपयांचा सडवा मोहाफास जप्त केला आहे. याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई करचखेडा येथील वैनगंगा नदीकाठच्या नाल्यापाशी करण्यात आली. तेथून अल्का योगेश केवट (वय ३०) हिच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचा २१० किलो सडवा मोहाफास जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत मौजा नवेगाव शेतशिवारात छापा टाकून २० ड्रममध्ये भरलेला ८०० किलो सडवा मोहाफास व ड्रम असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी प्रिती नरेश पुसाम (वय ४२) ही पसार झाली.
दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. इंगळे व पो.हवा. डोरले यांनी केली.





