– चोरटे पोलिसांच्या जाळ्यात; ट्रकसह ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
संदीप कांबळे, कामठी :- कामठी तालुक्यातील गुमथळा शिवारातील पॅरामाउंट कंपनीच्या आवारातून सुमारे ८ लाख १० हजार रुपये किमतीची एक टन वजनाची लोखंडी कॉईल चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा वडोदा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
भूषण गोविंद बुरेवार (४५, वॉर्डेपुरा, कामठी) आणि शुभम दत्तू चिपळकर (२९, सौनेगाव, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री कंपनीतून नऊ टनांच्या चार लोखंडी कॉईल चोरीला गेल्याची तक्रार कंपनीचे मालक महेश गोयका यांनी दाखल केली होती. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान कंपनीच्या सुरक्षा रक्षकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरी केलेल्या लोखंडी कॉईल नागपूर येथील उप्पलवाडी परिसरातील सैसाद समसाद शहा याला विकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर पोलिसांनी शहा यांच्या दुकानावर धाड टाकून चोरीच्या कॉईल हस्तगत केल्या. या कारवाईत ३५ लाख रुपये किमतीचा ट्रक (क्र. एमएच ४०, ए.के. १३५४) तसेच ८ लाख १० हजार रुपये किमतीची कॉईल, असा एकूण ४३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठाणेदार मनोज गदादे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश बोधले व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





