कामठी :- प्रभाग क्रमांक ४ मधील खलाशी लाईन परिसरात गायीचे वासरू नाल्यात पडून अडकल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. ही बाब निदर्शनास येताच नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विवेक गेडाम व राजा वाघमारे यांनीही मदतीसाठी पुढाकार घेत मुक्या जीवाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
वासरू नाल्यात अडकल्याने त्याची अवस्था गंभीर झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या फायर ब्रिगेड पथकाला पाचारण करण्यात आले. नागरिकांच्या सहकार्याने फायर ब्रिगेडच्या जवानांनी अथक प्रयत्न करत वासराला नाल्यातून सुखरूप बाहेर काढले.
वेळीच मिळालेल्या मदतीमुळे एका मुक्या जीवाला जीवनदान मिळाले. नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांच्यासह विवेक गेडाम, राजा वाघमारे आणि फायर ब्रिगेड पथकाच्या या तत्परतेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मुक्या जीवाच्या संकटात माणुसकीने धाव घेतली आणि खलाशी लाईनमध्ये संवेदनशीलतेचा हृदयस्पर्शी प्रत्यय आला.





