– ठिय्या आंदोलनानंतर दिले होते लेखी आश्वासन; वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
पांढरकवडा :- शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना, युवा टायगर फोर्सने महावितरण प्रशासनाविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी याच वीज समस्येसाठी युवा टायगर फोर्सच्या वतीने महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासह विविध मागण्यांबाबत लिखित स्वरूपात आश्वासन दिले होते.
मात्र, या आश्वासनानंतरही पांढरकवडा शहरातील अनेक भागांत वीजेचा लपंडाव सुरूच असल्याने “महावितरणने दिलेले लिखित आश्वासन पाळले की नाही?” असा थेट सवाल युवा टायगर फोर्सने उपस्थित केला आहे.
वारंवार वीज जाणे, अचानक वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीज ये-जा करण्याच्या प्रकारामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
आश्वासन कागदावरच नको, प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरळीत हवा!
युवा टायगर फोर्सने स्पष्ट भूमिका घेत “नागरिकांच्या प्रश्नावर केवळ आश्वासन देऊन चालणार नाही; त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे,” असा इशारा महावितरणला दिला आहे.
वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करावेत, वारंवार वीज खंडित होण्यामागील कारणांचा कायमस्वरूपी निपटारा करावा आणि नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
आता युवा टायगर फोर्सचा ‘आर या पार’चा इशारा!
यापूर्वी ठिय्या आंदोलन करून लिखित आश्वासन मिळवूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसेल, तर आता पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा युवा टायगर फोर्सच्या वतीने देण्यात आला आहे.
“लिखित आश्वासनाचा आदर करा, पांढरकवडावासीयांना सुरळीत वीज द्या; अन्यथा महावितरणविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरू!” अशी आक्रमक भूमिका युवा टायगर फोर्सने घेतली आहे.
आता महावितरण प्रशासन आश्वासनाची अंमलबजावणी करून नागरिकांना दिलासा देणार की युवा टायगर फोर्सला पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार, याकडे पांढरकवडावासी यांचे लक्ष लागले आहे.





