spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अंत्यसंस्कारासाठी जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्या!

– नवेगावबांध येथे नागरिकांची मागणी; चार महिन्यांपासून लाकूड उपलब्ध नसल्याने गैरसोय

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध :- ग्रामीण भागातील धार्मिक, वैवाहिक तसेच अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडाची गरज भासते. मात्र, नवेगावबांध परिसरात मागील चार महिन्यांपासून अंत्यसंस्कारासाठी आवश्यक जळाऊ लाकूड उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन जळाऊ लाकडाची नियमित उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अंत्यसंस्काराच्या वेळी लाकूड मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होते. ऐन दुःखाच्या प्रसंगी लाकूड उपलब्ध नसल्याने मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. समशानभूमीत जळाऊ लाकडाचा पुरेसा साठा ठेवून त्याचे नियोजनबद्ध वाटप करावे, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सवलतीच्या किंवा मोफत दरात लाकूड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुकलेली व पडलेली झाडे अधिकृत स्रोतांतून उपलब्ध करून घेऊन त्यांचा अंत्यसंस्कारासाठी वापर करावा, अशी सूचनाही नागरिकांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या मागणीचे निवेदन देताना के. ए. रंगारी, आर. व्ही. लांजेवार, आर. के. फरदे, शीतल राऊत, तळशीराम कुंभरे, शुभम सांगोळकर, हेमचंद लाडे, हरिश्चंद्र लाडे, भास्कर बडोले आणि बहादूर वाडवे उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.