नागपूर ११ : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त तसा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर यांच्या देखरेखीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत मनपाद्वारे शहरात विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. कार्यक्रमाची सुरुवात नागरिकांच्या मनात राष्ट्रध्वजाप्रती अभिमान जागृत करण्यासाठी घेतलेल्या ‘तिरंगा प्रतिज्ञा’ने झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात हाती तिरंगा घेऊन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्म्यांना अभिवादन करणारा तिरंगा मेळा घेण्यात आला. मेळ्यादरम्यान परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. या मेळ्यात शिवकालीन युद्ध कलेचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यासाठी संपूर्ण परिसराला तिरंग्याच्या रंगांनी सजविण्यात आले होते. यावेळी मनपाचे उपायुक्त राजेश भगत यांच्या हस्ते जय भवानी ढोल ताशा पथकाचे प्रमुख जतीन भिमटे आणि चिमाजी भोसले आखाड्याचे प्रमुख अर्जुन भोसले यांना मनपाचा मानाचा दुपट्ट्याने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा नायडू, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, क्रीडा निरीक्षक उज्वला चरडे, जितेंद्र गायकवाड, तसेच क्रीडापटू आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे नागपूर शहरात देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मनपाचे आयोजन तिरंगा मेळाव्यात नागरिकांनी घेतली तिरंगा प्रतिज्ञा









