– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट; अल्पसंख्याक विकास निधीतून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
खापा, वार्ताहर :- नागपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची भेट घेण्यात आली. यावेळी खापा शहरातील मुस्लिम कब्रस्तानांच्या विकासाचा महत्त्वपूर्ण प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
खापा नगरपरिषद हद्दीत नवीन बसस्थानक परिसरात तसेच किल्लापुरा परिसरातील बाबा लष्कर शाह शहीद दर्गा, कन्हान नदीलगत अशी दोन मुस्लिम कब्रस्ताने आहेत. या दोन्ही ठिकाणी दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कब्रस्तान परिसरात नियमित स्वच्छता, सुरक्षितता, पिण्याचे व वापराचे पाणी, प्रकाश व्यवस्था तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन्ही कब्रस्तानांमध्ये आवश्यक विकासकामे तातडीने करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.
नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांच्या वतीने नगरपरिषदेमार्फत विधानपरिषद आमदार डॉ. राजीव पोतदार यांना दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. अल्पसंख्याक विकास निधी योजनेअंतर्गत खापा शहरातील दोन्ही मुस्लिम कब्रस्तानांच्या विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निधीतून कब्रस्तानांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास परिसराचा विकास होऊन दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, हजरत बाबा लष्कर शाह शहीद दर्गाह कमेटी, खापा मस्जिद कमेटी तसेच प्यारू शेख, इस्माईल (बब्बू) शेख, युनुस कुरेशी, महेबुब शेख, मुस्ताक सुभेदार, जब्बार शेख, हारून शेख, हाजी गफ्फार शेख, हाजी गरिबा शेख, यासीन पठाण, हसन कुरेशी, शकील कुरेशी, कौसर खान, मकसूद शेख, आसिफ शेख, रूमान शेख, मोहसिन पठाण यांच्यासह शहरातील समस्त मुस्लिम समाज बांधवांकडून विधानपरिषद आमदार डॉ. राजीव पोतदार व नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांचे या मागणीसाठी सर्वस्तरातून कौतुक होत असून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.





