spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे

– ‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची माहिती; ‘वीर योजना’बाबतही जनजागृती

गडचिरोली :- गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी नागरिकांसाठी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि नगर परिषद व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन व समन्वय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व औषधोपचार

सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, सामान्य रुग्णालय, धर्मादाय रुग्णालये तसेच सेवाभावी सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. शिबिरांमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांची आरोग्य तपासणी करतील. रक्तदाब, मधुमेह तसेच प्राथमिक व आवश्यक निदानात्मक तपासण्या मोफत करण्यात येतील. गरजेनुसार आवश्यक औषधांचेही मोफत वितरण करण्यात येणार आहे.

तपासणीदरम्यान गंभीर आजाराचे निदान झाल्यास संबंधित रुग्णांना पुढील उपचारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध उपचार सुविधा तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध होणाऱ्या मदतीबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

‘लोकसंवाद-२०२६’मधून शासकीय योजनांची माहिती

गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने ‘लोकसंवाद- २०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. विविध योजनांचे स्वरूप, त्यासाठीची पात्रता, उपलब्ध लाभ तसेच लाभ मिळविण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन करण्यात येईल.

याच उपक्रमांतर्गत ‘वीर योजना’बाबतही विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. शहीद जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक व पोलीस बांधव तसेच संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या कल्याणासाठी उपलब्ध विविध लाभ, शासकीय सवलती आणि सहाय्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

नागरिकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या परिसरातील नोंदणीकृत गणेश मंडळांमध्ये आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेट देऊन मोफत आरोग्य तपासणी व उपलब्ध आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून विविध शासकीय योजना व ‘वीर योजना’बाबत माहिती जाणून घेऊन पात्र नागरिकांनी संबंधित योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.