spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मतदारांनो! मतदार यादीत आताच आपले नाव तपासा – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

– विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्याचा घेतला आढावा

हंसराज, भंडारा :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 (SIR) अंतर्गत प्रारूप मतदार यादीवर प्राप्त होणारे दावे व हरकती निकाली काढण्याच्या प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज भंडारा जिल्ह्यास भेट दिली. जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या यादीत आताच आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अंतिम मतदार यादी दि. 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सावन कुमार यांच्यासह, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव ,निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, उपजिल्हाधिकारी निवडणूक विकास व्यवहारे, उपविभागीय अधिकारी , तहसीलदार जिल्हा अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्याने पारदर्शक, अचूक आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यात येईल, असे सांगून मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी म्हणाल्या की, दि. 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यापूर्वी मतदारांनी मतदार यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत. नव्याने नाव नोंदविणे, नाव किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे अथवा इतर बदल आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

ज्यांच्या नावात विसंगती आहे किंवा ज्यांचे मॅपिंग झालेले नाही, अशा मतदारांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी संबंधित बीएलओ/बीएलए यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहून संबंधित बाबींची पूर्तता करून घ्यावी. कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.

प्रारूप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये, मतदान केंद्रे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनाही मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची नावे तपासण्यासाठी तसेच वस्ती, तांडा, पाडे आदी ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास किंवा दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत असल्यास नमुना 6 भरून द्यावा. मतदाराचे नाव वगळावयाचे असल्यास किंवा त्याबाबत हरकत असल्यास नमुना 7, तर एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्यास अथवा नाव, वय, पत्ता यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना 8 भरून द्यावा. संबंधित अर्ज सादर करण्याची मुदत दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे.

सध्या प्रसिद्ध झालेली प्रारूप मतदार यादी अंतिम मतदार यादी नाही

विशेष सखोल पुनरिक्षण-2026 च्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या सर्वसाधारण निवासी असल्याबाबतच्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यावर मुख्य भर देण्यात आला होता. त्यामुळे अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींचा समावेश प्रारूप यादीत करण्यात आलेला नाही. सध्या सुरू असलेल्या टप्प्यात अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.

याचप्रमाणे मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. दि. 1 ऑक्टोबर 2024 नंतर वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन मतदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच विशेष सखोल पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात विविध कारणांमुळे ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली नसतील, अशा पात्र नागरिकांनाही आता मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा सध्याचा टप्पा नवीन पात्र मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्यांवर केंद्रित आहे. या प्रक्रियेद्वारे एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वंचित राहणार नाही, याची सुनिश्चिती केली जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होणार आहे. त्यामुळे सध्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीची आधीच्या आकडेवारीशी तुलना करून कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कोणतेही मूल्यमापन करण्यापूर्वी अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांना प्रारूप मतदार यादी प्रत्यक्ष देण्यात यावी,असे असेही बिदरी यांनी निर्देश दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.