spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामठी पोलिसांची दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम

– नवीन व जुनी कामठी पोलिसांची संयुक्त सज्जता; ७ अधिकारी, ४२ अंमलदार व एसआरपीएफचे २२ जवान सहभागी

कामठी :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामठी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. संभाव्य अनुचित प्रकारांना प्रभावीपणे आळा घालण्यासह आपत्कालीन परिस्थितीत तातडीने नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने नवीन कामठी व जुनी कामठी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (१५ सप्टेंबर) दंगा नियंत्रण प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले.

पोलीस उपआयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्या नेतृत्वाखाली लष्करे ईदगाह मैदान येथे सायंकाळी ४ ते ६.१० वाजेपर्यंत हे प्रशिक्षण पार पडले.

गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, पोलिसांमध्ये समन्वय वाढविणे आणि संभाव्य तणावाच्या परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविणे, या उद्देशाने प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी दंगा नियंत्रणाच्या विविध उपाययोजनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या प्रशिक्षणात दोन्ही पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार, पोलीस मुख्यालयातील राखीव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, तीन प्रशिक्षक व चार सहकारी सहभागी झाले होते. एकूण ७ अधिकारी, ४२ अंमलदार तसेच एसआरपीएफ प्लाटूनचे २२ जवान यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.

गणेशोत्सव काळात शांतता, सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून, नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.