हंसराज, भंडारा सिहोरा :- गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे संचालकांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड इशारा सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी दिला आहे. नुकतेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मिटेवाणी येथील डीजे मालक हितेश राणे (२४) याच्यावर तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या ४ सप्टेंबरच्या आदेशानुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ व ध्वनीप्रदूषण नियम, २००० अन्वये सण-उत्सवात कर्णकर्कश डीजे साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची साऊंड सिस्टीम व वाहने तत्काळ जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केली जातील.
ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतो. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी पर्यावरणपूरक तसेच पारंपरिक पद्धतीने शांततेत उत्सव साजरा करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार विजय कसोधन यांनी केले आहे.





