संदीप कांबळे, कामठी :- कामठी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात तापाच्या आजाराने नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध वयोगटांतील नागरिकांमध्ये ताप, अंगदुखी, अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते.
मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे तापाच्या आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये तापाच्या आजाराची लक्षणे गंभीर स्वरूप धारण करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांनाही या आजाराचा सामना करावा लागत असल्याने आरोग्य यंत्रणेने विशेष दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
शहरासह ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये तापाच्या आजाराने त्रस्त रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. काही रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याने औषधोपचारासाठी अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
तापाच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तालुक्यातील शासकीय आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांनी ताप, अंगदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. पाणी उकळून किंवा शुद्ध करून प्यावे, परिसरात स्वच्छता राखावी तसेच डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात यावे.
कामठी तालुक्यात तापाच्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता आरोग्य विभागाकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना केव्हा राबविण्यात येणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





