– प्रमुख पर्यटनस्थळांवर ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रमांचे आयोजन
– जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक
गडचिरोली :- जिल्ह्यातील निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी देऊन पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक रोजगार व अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने दि. २३ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून नियोजनबद्ध तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
पर्यटन महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह वन, महसूल, पर्यटन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्ह्यातील पर्यटन एखाद्या विशिष्ट स्थळापुरता मर्यादित न ठेवता विविध जिल्ह्यातील पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार भागांतील पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडून चार पर्यटन सर्किट्सच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यामध्ये उत्तर सर्किटमध्ये टिपागड, मेंढालेखा, झाडापापडा व आरतोन्डी, तर दक्षिण सर्किटमध्ये फॉसिल पार्क, कमलापूर हत्ती कॅम्प आणि सोमनूर परिसराचा समावेश आहे. पूर्व व पश्चिम भागातील भामरागड त्रिवेणी संगम, हेमलकसा, मार्कंडा, चिचडोह बॅरेज, चपराळा अभयारण्य तसेच वनविभागामार्फत विकसित धनुरा व सेमाना परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे.
महोत्सवात नागरिकांसोबतच युवक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र तसेच स्थानिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांशी जोडण्यात येणार आहे.
पर्यटनस्थळांची ओळख अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्रेकिंग, नेचर वॉक, रील्स स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा आणि पर्यटनविषयक जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील निसर्गसंपदा आणि इको-टुरिझमच्या संधी लक्षात घेऊन सेमाना, मार्कंडा व सिरोंचा परिसरात नाईट कॅम्पिंग, बोटिंग तसेच सायन्स पार्क भेटीसारख्या उपक्रमांचाही समावेश करण्याचे नियोजन आहे.
महोत्सव हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम न राहता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची ओळख निर्माण करणारा आणि भविष्यात पर्यटनवाढीसाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम व्हावा, यासाठी प्रत्येक स्थळाचे वैशिष्ट्य प्रभावीपणे पर्यटकांसमोर आणावे. पर्यटनस्थळी आवश्यक सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, दिशादर्शक फलक तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक बाबींची संबंधित विभागांनी पूर्वतयारी करावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
वनविभाग व पर्यटन विभागाने स्थानिक ग्रामपंचायती, महाविद्यालये, युवक, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करावे. प्रत्येक पर्यटनस्थळासाठी जबाबदारी निश्चित करून सर्व उपक्रमांची नियोजनबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.





