– लोक अदालतीत तडजोड; नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून महिनाभरात दाव्याचा निपटारा
हंसराज,भंडारा :- अपघाती मृत्यू प्रकरणाचा नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून एका महिन्यात निपटारा करण्यात आला असून १२ सप्टेंबर रोजी लोक अदालतीत 66 लाखांचा दावा मंजूर करण्यात आला आहे.
लाखनी येथील संकेत सपाटे हे नागपूर येथे फार्मास्युटिकल कंपनीत क्षेत्रिय मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २० जानेवारी २०२६ ला राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार सडक येथे त्यांच्या मोटार सायकलला ट्रकने (सीजी ०४/ एमबी ७६०६) धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने संकेत सपाटे यांचा मृत्यू झाला. याबाबत लाखनी पोलीस ठाण्यात ट्रक चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर खुशबू संकेत सपाटे व इतर कुटुंबीयांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीत ४ ऑगस्ट २०२६ ला दावा केला होता.
भंडारा जिल्हा न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी आयोजित लोक अदालतीत इतर प्रकरणांसह हे अपघाताचे प्रकरण ठेवले होते. यामध्ये पक्षकार आणि विमा कंपनीचे अधिकारी यांनी ६६ लाख अपघात दावा मान्य केला. ही कारवाई नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. चे चिफ रिजनल मॅनेजर आर. एम. कथले, रिजनल मॅनेजर अरविंद चुडासमा, सुरेशकुमार नट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भंडाराचे वरिष्ठ शाखा प्रबंधक विनयकुमार आणि सहकारी तसेच नागपूरचे सहाय्यक मॅनेजर वैभव गोस्वामी, डेप्युटी मॅनेजर मुकेश मरघडे, पवन यांनी काम पाहिले.





