नागपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुननिरीक्षण-2026 सुधारित कार्यक्रमानुसार दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या दावे व हरकती 29 ऑक्टोंबर पर्यंत निकाली काढण्यात येणार असून दिनांक 4 नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
विशेष सखोल पुननिरीक्षण कार्यक्रमात पात्र नागरिकांनी सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादी अचूक व अद्ययावत असल्याची खात्री करावी, असे आवाहन 54-नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी प्रशांती माने यांनी केले आहे.
प्रारूप मतदार यादीनुसार 54-नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघात 31 ऑगस्ट 2026 नूसार एकूण 2 लाख 73 हजार 804 मतदार असून यामध्ये 1 लाख 35 हजार 623 पुरूष तर 1 लाख 38 हजार 166 महिला मतदार व 15 इतर मतदारांचा समावेश आहे. एसआयआर-फेज 3 अंतर्गत ज्या मतदारांच्या नोंदणीबाबत आवश्यक तपासणी अथवा सुनावणी अपेक्षित आहे, अशा प्रकरणांसाठी 21 सप्टेंबर ते 29 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत सुनावणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी सहा ठिकाणी सुनावणी घेण्यात येणार आहे. ही सुनावणी प्रत्येक दिवशी तीन सत्रामध्ये राहणार आहे. मतदारांनी नोटीसीनुसार निर्धारित दिनांक, वेळ व ठिकाणी सुनावणीच्या दिवशी आवश्यक कागदत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांना ऑनलाईन पद्धतीने voter.eci.gov.in या संकेतस्थळावर सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा असून आवश्यकतेनुसार नमुना-6, नमुना-7 व नमुना-8 हे अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेऊन कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावी. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे (नमुना-6), नाव वगळणे (नमुना-7), स्थलांतर (नमुना-8) अथवा मतदारांच्या नोंदीमध्ये आवश्यक दुरूस्ती करण्यासाठी मतदारांना निर्धारित पद्धतीने दावे व हरकती सादर करता येतील.
विशेष सखोल पुननिरीक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, पारदर्शक व त्रुटी विरहित करणे हा आहे. त्यामुळे मतदारांनी आपल्या नावाची व मतदार यादीची पडताळणी करावी. यासाठी अनाधिकृत व्यक्ती, मध्यस्थ अथवा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मतदार नोंदणी संबंधी अधिकृत माहिती केवळ संबंधित बीएलओ, एईआरओ, ईआरओ कार्यालयात तसेच अधिकृत निवडणूक संकेतस्थळ अथवा पोर्टल यांच्या माध्यमातूनच घ्यावी. मतदारांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 1950 उपलब्ध असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी प्रशांती माने यांनी दिली.





