किशोर साहू, मौदा :- मौदा शहराजवळील आजनगाव येथे एका गौमातेला पुलावरून नदीत फेकून दिल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना मंगळवार (ता. 15 सप्टेंबर)ला समोर आली.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय बजरंग दल मौदा शहर अध्यक्ष हिमांशू वडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक पोलीस पाटील तसेच मौदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

यानंतर राष्ट्रीय बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः नदीत उतरले आणि अथक प्रयत्न करून गौमातेला नदीतून बाहेर काढले.
गौमातेप्रती श्रद्धा व आदर व्यक्त करत हिंदू धर्माच्या विधी-विधानानुसार तिचा अंतिम संस्कार करण्यात आला. या सेवाकार्यात अश्विन बाबरे, अंकित कोसारे, प्रदीप शेंडे, पवन भोजने आणि आकाश मेश्राम यांनी सक्रिय सहभाग घेतला.
गौमातेवर अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.
“गौमातेचे संरक्षण, सेवा आणि सन्मान ही प्रत्येक हिंदूची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करावी,” असे राष्ट्रीय बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





