– राधाकृष्ण रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा; चंद्रशेखर अरगुलेवार यांच्या प्रयत्नांना यश
कामठी :- कामठी उपजिल्हा रुग्णालयातील नेत्रशस्त्रक्रिया विभागाचे नवीन बांधकाम सुरू असल्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची उपचारासाठी होणारी धावपळ लक्षात घेऊन तेजस संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या विनंतीवरून नागपूरच्या वर्धमाननगर येथील राधाकृष्ण रुग्णालयात गरजू रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कामठी शहर व तालुक्यातील अनेक गरीब रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, नेत्रशस्त्रक्रिया बंद असल्याने मोतीबिंदूच्या रुग्णांना उपचारासाठी इतरत्र जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांनी राधाकृष्ण रुग्णालयाचे संचालक गोविंद पोद्दार यांच्याशी चर्चा करून रुग्णांची अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
रुग्णांची व्यथा लक्षात घेत गोविंद पोद्दार यांनी तेजस संस्थेमार्फत येणाऱ्या रुग्णांवर राधाकृष्ण रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या. या सामाजिक उपक्रमाबद्दल अरगुलेवार यांनी पोद्दार यांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली.
तेजस संस्था नागपूर जिल्ह्यात मानवसेवा कार्यात कार्यरत असून, गरजू रुग्णांना उपचाराची सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांनी मच्छी पुल, शास्त्री चौक येथील तेजस संस्थेशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





