spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी तालुक्यातील ग्रामीण विकासाची धुरा तरुण सरपंचांच्या हाती!

– नव्या पिढीच्या नेतृत्वातून गावांच्या विकासाला नवी दिशा; पारंपरिक कारभाराला आधुनिक विचारांची जोड

संदीप कांबळे,कामठी :- नव्या पिढीच्या विचारांतून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त होत असतानाच कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात तरुण नेतृत्वाची नवी वाटचाल सुरू झाली आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या कारभाराची धुरा तरुण सरपंचांच्या हाती असून, येरखेडा व बिडगावसारख्या नगरपंचायतींमध्येही तरुण नगराध्यक्ष नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेला नव्या विचारांची जोड मिळत असल्याचे चित्र आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कामठी तालुक्यातील ग्रामीण भागाचे शहरीकरण वेगाने होत आहे. काही ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा मिळाला असला, तरी अनेक ग्रामपंचायती अद्याप ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या चौकटीत कार्यरत आहेत. या संस्थांच्या कारभारात तरुण नेतृत्वाचा वाढता सहभाग लक्षवेधी ठरत आहे.

येरखेडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजकिरण बर्वे, बिडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष वीरू जामगडे, तसेच रणाळा ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज साबळे, गादा ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन डांगे, चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगलागौरी विलास भोयर, जाखेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती सचिन भोयर आणि सोनेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदा विजय शिंदे-मेश्राम यांच्यासारख्या तरुण नेतृत्वावर गावांच्या विकासाची जबाबदारी आहे.

वयाने तरुण असले, तरी ग्रामकारभाराची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या नेतृत्वासमोर विकासाचे प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान आहे. पारंपरिक कारभाराला आधुनिक विचारांची जोड देत पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि डिजिटल सुविधांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. गावांच्या बदलत्या गरजा ओळखून नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य देणे, ही काळाची मागणी ठरत आहे.

ग्रामविकासाच्या प्रक्रियेत तरुण सरपंचांची भूमिका केवळ विकासकामांच्या उद्घाटनापुरती मर्यादित न राहता, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणे, शासकीय योजनांचा प्रभावी पाठपुरावा करणे आणि उपलब्ध निधीचा योग्य वापर करण्यापर्यंत विस्तारण्याची अपेक्षा आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढविणे, निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि विकासकामांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे, यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारावरील विश्वास दृढ होऊ शकतो.

ग्रामीण भागातील अनेक गावांसमोर आजही पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, पथदिवे आणि रोजगाराच्या संधी यांसारखी आव्हाने कायम आहेत. या प्रश्नांकडे केवळ तात्पुरती कामे म्हणून न पाहता, गावाच्या भविष्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. तरुण सरपंचांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने विकास आराखडे तयार केल्यास गावांच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळू शकते.

महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांचा विकास प्रक्रियेत सहभाग वाढविणे, तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय अधिक प्रभावी करणे, हीदेखील महत्त्वाची बाब आहे. उपलब्ध साधनसंपत्ती, शासकीय निधी आणि स्थानिक गरजा यांचा समन्वय साधत विकासकामांना गती देणे, ही तरुण नेतृत्वासमोरील प्रमुख जबाबदारी ठरणार आहे.

कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात तरुण नेतृत्वाला संधी मिळत असताना, या नेतृत्वाकडून केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामगिरीची अपेक्षा आहे. गावातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक कारभार, नियमित ग्रामसभा आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर दिल्यास विकासाला ठोस दिशा मिळू शकते.

तरुणाईच्या नेतृत्वाला ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता लाभल्यास कामठी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला नवी उंची मिळण्याची शक्यता आहे. नव्या पिढीच्या नेतृत्वाची ही वाटचाल गावांच्या विकासासाठी कितपत परिणामकारक ठरते, हे आगामी काळातील प्रत्यक्ष कामगिरीवर अवलंबून राहणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.