spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खलाशी लाईनमध्ये जुने निंबाचे झाड घरांवर कोसळले

– धोकादायक झाडाबाबत चार वेळा निवेदने देऊनही नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष; घरांचे, वाहनांचे नुकसान, एका महिलेला दुखापत

संदीप कांबळे, कामठी :- धोकादायक झाडांबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे वास्तव कामठीतील खलाशी लाईन येथील दुर्घटनेने समोर आणले आहे. नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधील खलाशी लाईन येथे मध्यरात्री सुमारे ९० वर्षे जुने निंबाचे झाड अचानक घरांवर कोसळले. या दुर्घटनेत घरांचे, घरातील साहित्याचे तसेच तीन दुचाकींचे नुकसान झाले असून, एका महिलेला हाताला दुखापत झाली. सुदैवाने जीवितहानी टळली.

प्राप्त माहितीनुसार, सदर निंबाचे झाड जुने व पडक्या अवस्थेत असल्याने ते केव्हाही कोसळण्याची शक्यता होती. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला चार वेळा निवेदने देऊन धोक्याची कल्पना दिली होती. मात्र, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन झाड हटविणे किंवा आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आहे.

अखेर मध्यरात्री झाड घरांवर कोसळल्याने नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धोकादायक झाडाबाबत चार वेळा सूचना देऊनही प्रशासनाने कार्यवाही का केली नाही? नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी दुर्घटना घडणे आवश्यक आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी प्रशासनाचा निष्काळजीपणा कुणाच्या जीवावर बेतला असता, याची कल्पनाही करवत नाही.

या दुर्घटनेत अनिता जगदीश बैस, जगदीश बैस, विनोद कचरू हाटे, राजेश मोहन पाटील, दीपक वासनिक आदींच्या घरांचे नुकसान झाले. तसेच घरातील साहित्य व परिसरातील तीन दुचाकींचेही नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याने परिसरातील विद्युत खांबही कोसळले.

घटना घडताच नगरसेवक अनिल सूर्यवंशी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दीपक वासनिक यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला तसेच प्रशासनाला माहिती दिली.

– खलाशी लाईनमधील दुर्घटनेनंतर कामठी नगर परिषद हद्दीतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील जीर्ण, पडक्या अवस्थेतील व घरांवर झुकलेल्या झाडांचे सर्वेक्षण करून त्यांची तातडीने छाटणी अथवा आवश्यकतेनुसार विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या जीविताची जबाबदारी प्रशासनाची नाही का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

मेट्रोच्या खोदकामाचा हादरा?

खलाशी लाईन परिसरालगत मेट्रोचे बांधकाम प्रगतीपथावर असून, मेट्रो स्थानकासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. या बांधकामामुळे परिसरातील घरांना भेगा पडत असून, घरांची पडझड होत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुर्घटनेच्या वेळीही मेट्रोचे काम सुरू असल्याने खोदकामाच्या हादऱ्यांमुळे झाड कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, झाड कोसळण्यामागील नेमके कारण अधिकृत पाहणी व तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनासह संबंधित बांधकाम यंत्रणेने घटनास्थळाची पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.