spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर

– जम्मू येथे महाराष्ट्राच्या लोककला, शास्त्रीय नृत्य आणि गायनाची सुरेल मैफिल

मुंबई :- गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राची समृद्ध लोककला, शास्त्रीय कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या विविध भागांत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाला जम्मू येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पद्मश्री पद्मा सचदेव गव्हर्नमेंट कॉलेज ऑडिटोरियम, गांधीनगर, जम्मू येथे शुक्रवारी (दि.18) झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध लोककला, शास्त्रीय नृत्य आणि गायनाचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. गणेशभक्ती, महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि विविध कलाविष्कार यांचा सुरेल संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ या भक्तिमय जयघोषाने कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील लोककला आणि शास्त्रीय कलापरंपरेचे सादरीकरण जम्मूतील रसिकांसमोर झाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख व्यापक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाला या कार्यक्रमातून बळ मिळाले.

महाराष्ट्राच्या लोककला, शास्त्रीय कला आणि संगीतपरंपरेला राज्याच्या सीमा ओलांडून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच देशाच्या विविध भागांतील रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची अनुभूती करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्याच अनुषंगाने ‘लोककलेतील श्रीगणेश’ हा कार्यक्रम जम्मू येथे सादर करण्यात आला.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘लोककलेतील श्रीगणेश’च्या माध्यमातून जम्मू येथे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.