spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने इसमाचे एटीएम कार्ड बदलले; खात्यातून ४० हजार लंपास

– नवीन कामठीतील कळमना रोडवरील एसबीआय एटीएममधील प्रकार; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या आनंद फुलझेले नामक इसमाला एटीएम केंद्राजवळ आधीच असलेल्या दोन तरुणांनी मदतीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्याचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलल्याचा प्रकार नवीन कामठी परिसरात उघडकीस आला आहे. कार्ड बदलल्यानंतर संबंधित इसमाच्या बँक खात्यातून ४० हजार रुपये रोख काढून घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुष्का आनंद फुलझेले (१९), रा. जयभीम चौक, कामठी यांच्या वडिलांसोबत ही घटना घडली. ते १७ सप्टेंबर रोजी दुपारी चार दरम्यान कळमना रोडवरील एसबीआय एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममध्ये व्यवहार सुरू असताना तेथे उपस्थित असलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतविले.

वृद्धाने एटीएममधून दोन हजार रुपये काढल्यानंतर संबंधित इसमांनी व्यवहार पूर्ण झाला नसल्याचे सांगत पुन्हा व्यवहार करण्यास सांगितले. याचदरम्यान हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून दुसरे कार्ड त्यांच्या हातात देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ४० हजार रुपये रोख काढण्यात आले.

खात्यातून रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी दोन अद्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास . पोलीस उपनिरीक्षक विनायक इंगळे करीत आहेत.

एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेताना नागरिकांनी सावध राहण्याची गरज असून, व्यवहारादरम्यान कार्ड कोणाच्याही हाती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.