spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; एकाच घरावर ५० ते १०० मतदार!

– घर क्रमांकाच्या जागी ‘शून्य’ आणि गावाचे नाव; अंतिम यादीपूर्वी प्रशासकीय फेरपडताळणी करा – माजी आमदार चरण वाघमारे

हंसराज,भंडारा :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक मतदारांच्या नावासमोर चक्क घर क्रमांक ‘०’ (शून्य) किंवा गावाचेच नाव नोंदवण्यात आले असून, काही ठिकाणी तर एकाच घर क्रमांकावर ५० ते १०० मतदारांची नावे दाखवण्यात आली आहेत. या त्रुटींची गंभीर दखल घेत निवडणूक विभागाने स्वतःहून प्रशासकीय स्तरावर तातडीने फेरपडताळणी करावी आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व चुका दुरुस्त कराव्यात, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले असून, त्याची प्रत राज्य निवडणूक आयोगालाही पाठवली आहे.

बीएलओंच्या (BLO) प्रत्यक्ष पडताळणीवर प्रश्नचिन्ह

मतदार याद्यांच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत संबंधित बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांनी घरोघरी जाऊन मतदारांची व त्यांच्या पत्त्यांची प्रत्यक्ष खातरजमा (Verification) करणे बंधनकारक होते. मात्र, १ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीचे प्राथमिक निरीक्षण केले असता भंडारा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये अक्षम्य चुका समोर आल्या आहेत. मतदार यादीच्या सुरुवातीच्या, मधल्या आणि शेवटच्या पानांवरही अशा चुकांचा भडिमार आहे. त्यामुळे बीएलओंनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रामाणिकपणे सर्व्हेक्षण केले आहे का? असा संतप्त सवाल माजी आमदार वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.

यादीत आढळलेल्या प्रमुख त्रुटी :

🔹 शेकडो मतदारांच्या नावासमोर घर क्रमांकाच्या रकान्यात केवळ ‘०’ (शून्य) नमूद आहे.

🔹 अनेक ठिकाणी घर क्रमांकाऐवजी थेट गावाचेच नाव टाकण्यात आले आहे.

🔹 एकाच घर क्रमांकावर ५०, ७०, ८० ते अगदी १०० पर्यंत मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत.

🔹 तांत्रिक आणि संगणकीय नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती दिसून येत आहे.

हरकतीची वाट न पाहता प्रशासनाने स्वतःहून दुरुस्ती करावी!

निवडणूक विभागाने १ ते ३० सप्टेंबर दरम्यान हरकती व सूचना मागविल्या असल्या, तरी केवळ मतदारांच्या हरकतींवर अवलंबून राहणे चुकीचे ठरेल, असे वाघमारे यांनी निवेदनात नमूद केले. “सामान्य मतदार प्रारूप यादीत केवळ आपले नाव आणि स्पेलिंग बरोबर आहे की नाही, एवढेच तपासतो. घर क्रमांक चुकीचा आहे किंवा तिथे गावाचे नाव आले आहे, अशा तांत्रिक त्रुटी सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाहीत. मतदाराने वैयक्तिक हरकत घेतली नाही म्हणून चुकीची यादी बरोबर गृहीत धरता येणार नाही. ही बाब निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेशी व विश्वासार्हतेशी संबंधित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख मागण्या :

🔹भंडारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या प्रारूप मतदार याद्यांची प्रशासनाने स्वतःहून फेरपडताळणी करावी.

🔹’घर क्रमांक ०’, गावाचे नाव आणि एकाच घरावर असामान्य मतदार संख्या असलेल्या नोंदींची स्वतंत्रपणे क्षेत्रीय तपासणी व्हावी.

🔹बीएलओंच्या प्रत्यक्ष भेटींच्या नोंदी तपासाव्यात आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी.

या चुका डेटा एन्ट्री ऑपरेटर, तांत्रिक बिघाड की कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्या, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.

लोकशाहीत अचूक मतदार यादी हा निष्पक्ष निवडणुकीचा पाया आहे. त्यामुळे सर्व त्रुटींचे तातडीने निराकरण करूनच पूर्णपणे शुद्ध व अद्ययावत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी. प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल न घेतल्यास निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही चरण वाघमारे यांनी दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.