– चहाच्या टपरीवरून शिक्षकी पेशापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; सर्वत्र कौतुक
हंसराज,भंडारा तुमसर :- पंचायत समिती तुमसर अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथील दिनेश अशोक पेरे यांची भंडारा जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक पदावर निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे त्यांचा संघर्षमय प्रवास परिसरासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
दिनेश पेरे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांचे वडील गावात छोट्याशा चहाच्या टपरीवर काम करायचे, तर आई जिल्हा परिषद शाळेत तुटपुंज्या मानधनावर शालेय पोषण आहाराची खिचडी शिजवण्याचे काम करत असे. अशा बिकट परिस्थितीत दिनेश यांनी वडिलांना चहाच्या टपरीवर मदत करत आपले शिक्षण जिद्दीने सुरू ठेवले.
आई-वडिलांचे अपार कष्ट आणि स्वतःची मेहनत यांच्या जोरावर दिनेश यांनी परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले. चहाच्या टपरीवरून थेट जिल्हा परिषद शिक्षकापर्यंत मजल मारणाऱ्या दिनेश पेरे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून सर्वत्र भरभरून कौतुक व अभिनंदन होत आहे.





