– रामगढ आनंदनगरमधील घटना; यश बागडेसह चौघांविरुद्ध गुन्हा
कामठी :- काका-सासऱ्याला मारहाण होत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी धावून गेलेल्या तरुणावर आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना रामगढ आनंदनगर परिसरात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी यश मिलिंद बागडे (वय २०) व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिजय बहादूर जगने (वय ३८, रा. रामगड आनंदनगर, गॅस गोडाऊनजवळ, कामठी) हे रात्री सुमारे १० वाजता जेवण केल्यानंतर घराजवळ फिरत होते. त्यावेळी यश बागडे व त्याचे तीन साथीदार त्यांच्या काका-सासऱ्याला हातबुक्क्यांनी मारहाण करीत असल्याचे त्यांनी पाहिले. मारहाण थांबविण्यासाठी जगने पुढे गेले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
दरम्यान, यश बागडे याने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून जगने यांच्या डोक्यावर वार केला. त्यात ते जखमी झाले. घटनेची चाहूल लागताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिक येत असल्याचे पाहून आरोपी व त्याचे साथीदार तेथून पसार झाले.
घटनेची माहिती रात्री साडेअकराच्या सुमारास नवीन कामठी पोलिसांना मिळाली. त्यानंतर जगने यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११०, ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





