spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माऊली नगर येथील पुलाचे बांधकाम व सिमेंट रस्त्यासाठी खासदार निधीतून मंजुरी द्यावी: नवेगावबांध फाउंडेशनची खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे मागणी

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी 

नवेगावबांध :- येथील माऊली नगर परिसरातील नागरिकांना भेडसावणारी दळणवळणाची अडचण दूर करण्यासाठी खासदार निधीतून रॅम्प ब्रिज व सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नवेगावबांध फाउंडेशनच्या वतीने राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नवेगावबांध ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माऊली नगर परिसरातील जलाशयाच्या पाळीखालील नाल्यावरून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या बिकट व कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात व दैनंदिन प्रवासादरम्यान या नाल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून नेहमी अपघाताची भीती कायम असते.

या ठिकाणी नाल्यावर पाईप दाबून योग्य रॅम्प ब्रिजचे काम पूर्ण केल्यास माऊली नगर येथील नागरिकांचा ये-जा करण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय वार्ड क्र. ५ मधील चैन क्रमांक ११ ते गिरीधर गायकवाड यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची मोठी दैनावस्था झाली असून, या रस्त्याचे सिमेंट्रीकरण झाल्यास मुख्य वाहतुकीची उत्तम सोय उपलब्ध होईल, असेही नमूद केले आहे.

दरम्यान, सदर कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊन हे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांच्यासह खासदार राजेंद्र जैन यांनी दिले आहे.

या निवेदनावर नवेगावबांध फाउंडेशनचे सचिव रामदास बोरकर यांच्यासह स्थानिक नागरिक कैलाश अर्जुन मेश्राम, शामराव बळीराम मेश्राम, यादोराव गुलाब सिडाम, गणेश अंताराम मेश्राम, शेषराव गणेश भुमके, ओमकार माणिक मेश्राम, निकेश प्रकाश भुमके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.