– थकीत वीजबिल व योजना सुरू करण्यावरून खडाजंगी
– सरपंचांच्या अपेक्षांवर फिरले पाणी; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
पंकज परशुरामकर प्रतिनिधी नवेगावबांध :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ववत करा आणि थकीत वीजबिलांचा प्रश्न जिल्हा परिषदेने प्राधान्याने सोडवावा, या मागणीसाठी बोलावण्यात आलेली विशेष सभा अत्यंत वादळी ठरली. चर्चेदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आणि उत्तरांवर तीव्र असंतोष व्यक्त करत आमदार राजकुमार बडोले यांनी सभेच्या मध्यातूनच बाहेर पडत ‘सभात्याग’ केला. या अनपेक्षित प्रकारामुळे जिल्हा परिषद वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुख्य कार्यपालन अधिकारी (CEO) यांच्या सभागृहात आमदार राजकुमार बडोले यांच्या पत्राच्या अनुषंगाने या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेला जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी अध्यक्ष राहंगाले, रचना गहाणे, मुख्य कार्यपालन अधिकारी, कार्यकारी अभियंता वानखेडे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सरपंचांची मोठी उपस्थिती होती. तसेच सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समितीचे अध्यक्ष किशोर तरोणे, सचिव कालिदास पुस्तोडे, शिरेगाव बांध पाणीपुरवठा मंडळाचे अध्यक्ष टीकाराम कापगते व सचिव नीलकंठ बोरकर यांचीही मुख्य उपस्थिती होती.

‘ग्रामीण जनतेला पाणी देणे जि.प.चे दायित्व’
बैठकीच्या सुरुवातीलाच आमदार राजकुमार बडोले यांनी आक्रमक भूमिका घेतली. “ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवणे ही जिल्हा परिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. थकीत वीजबिलांचा तिढा सोडवून बंद पडलेल्या योजना तातडीने सुरू कराव्यात,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मात्र, जि.प. प्रशासनाकडून व अध्यक्षांकडून यावर ठोस आश्वासन मिळण्याऐवजी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
चर्चेचा सूर चढला अन् आमदारांनी सोडले सभागृह!
चर्चेदरम्यान ठोस निर्णय घेण्याऐवजी वेळ काढूपणा केला जात असल्याचे पाहून आमदार बडोले यांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर थेट आक्षेप घेतला. “माझे म्हणणे ऐकून घेतले जात नाही आणि संवेदनशील प्रश्नावर गांभीर्याने तोडगा काढला जात नाही,” असा आरोप करत त्यांनी संतप्त पवित्रा घेतला आणि सभेच्या मध्यातूनच सभात्याग केला. आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सभेत प्रचंड अस्वस्थता पसरली आणि अखेर ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविनाच गुंडाळावी लागली.
सरपंचांचा हिरमोड, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल या अपेक्षेने दूरवरून आलेल्या सरपंचांचा आणि गावकऱ्यांचा या प्रकारामुळे मोठा हिरमोड झाला. विशेष म्हणजे, ज्या आमदारांच्या पुढाकाराने जि.प. मधील सत्ताकारणाला दिशा मिळाली, त्याच आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
पाठपुरावा सुरूच राहणार!
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्याने ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे वीजबिलांचा प्रश्न तातडीने सोडवून पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व सरपंचांनी दिला आहे. आता हा तिढा शासन किंवा वरिष्ठ पातळीवर कसा सुटणार, याकडे अर्जुनी मोरगावच्या जनतेचे लक्ष लागले आहे.





