Home Latest News मी मराठवाड्याची लेक, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही – सुनेत्रा पवार

मी मराठवाड्याची लेक, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही – सुनेत्रा पवार

0
9

पुणे :- मी मराठवाड्याची लेक आहे. या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि वेदना मला चांगल्या प्रकारे समजतात. कोणत्याही शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही,” असा शब्द राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला. लोहा तालुक्यातील बारूळ फाटा आणि सोनखेड येथे पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.

 सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारूळ फाटा येथील शेतकरी संदीप रामराव जायभाय यांच्या शेताला भेट दिली. 9 जुलै रोजी लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची सद्यस्थिती, पिकाची झालेली वाढ, संभाव्य उत्पादन आणि पावसाच्या खंडीतपणामुळे झालेल्या परिणामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट चर्चा करत शेतीतील समस्या जाणून घेतल्या.

बळीराजाच्या अडचणींवर चर्चा

बांधावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी केवळ पिकांच्या नुकसानीचीच माहिती घेतली नाही, तर शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि कुटुंबाच्या गरजांबाबतही चौकशी केली. त्या म्हणाल्या, “शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण, जनावरांचा चारा आणि संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा राज्य शासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाची अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींच्या या काळात शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश

शेतशिवारातील भीषण परिस्थितीची नोंद घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, स्थानिक प्रशासनाने संपूर्ण परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा आणि आवश्यक ती कार्यवाही करावी. शेतकर्‍यांना लवकरात लवकर भरघोस मदत आणि उपाययोजना मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिले.